- मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा पत्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ डिसेंबर २०२५) :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेरगावच्या शिक्षण समितीच्या माजी सभापती मनीषा पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर गंभीर शंका उपस्थित करण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र, जन्मदाखला आणि इतर शासकीय कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचा आरोप करत काही स्थानिक नागरिकांनी न्यायालयाची दार ठोठावली आहेत.
याचिकाकर्त्यांच्या मते, पवार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये अनेक विसंगती आढळल्या आहेत. पॅनकार्डवर जन्मतारीख १ जून १९८० अशी, तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ६ जून १९८४ अशी नोंद आढळते. याशिवाय, शालेय दाखल्यावर केवळ आठवीपर्यंत शिक्षण झाल्याचा उल्लेख असताना, शाळेत प्रवेश १३ जून १९९६ आणि केवळ तीन महिन्यांत ३० सप्टेंबर १९९६ रोजी शाळा सोडल्याची नोंद असल्याने हा दाखला संशयास्पद असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच, मनीषा पवार यांच्या वडिलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ‘हिंदू-बौद्ध’ असा उल्लेख, स्वतः पवार यांच्या दाखल्यावर ‘हिंदू मांग’, तर जात प्रमाणपत्रावर ‘महार’ अशी वेगवेगळी नोंद असल्याचा ठपका ठेवत, खोटे शपथपत्र सादर करून प्रमाणपत्र मिळविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण वादामुळे येथून त्यांच्या निवडणूक लढवण्यावर बंदी आणण्याची मागणी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. दरम्यान, पवार यांच्या कुटुंबीयांनी आरोप फेटाळले असले तरी, निवडणुकीच्या अगोदर उभ्या राहिलेल्या या शंकांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे आणि मनीषा पवार यांची विश्वासार्हता प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
प्रमोद पवार (मनीषा पवार यांचे पती) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “२०१७ नंतर दिलेल्या निकालानुसार जात ‘महार’ असल्याचे स्पष्ट झाले होते. विरोधक मुद्दाम जुने विषय उकरत आहेत. काही चुकीचे असते तर आम्ही पाच वर्ष नगरसेवकपदावर राहिलो नसतो.”
तथापि, या स्पष्टीकरणानंतरही प्रकरणातील तफावत उघड होत असल्याने, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी अधिक जोर धरताना दिसत आहे.












