- चार स्वतंत्र वाहनांच्या ताफ्यातून पूर्वनियोजित मार्गानुसार वाहतुकीचा दावा…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा पत्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ डिसेंबर २०२५):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाकरिता वापरली जाणारी ईव्हीएम यंत्रे आणि निवडणूकसाहित्य कडेकोट बंदोबस्तात पिंपरी येथे दाखल झाले. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बीड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून ही यंत्रे सुरक्षितरीत्या आणण्यात आली.
बीडमधील गेवराई, पाटोदा, आष्टी तसेच कोल्हापूरमधील राधानगरी, आजरा, कागल, भुदरगड, गडहिंग्लज आणि चंदगड येथील यंत्रांचा यात समावेश आहे. चार स्वतंत्र वाहनांच्या ताफ्यातून पूर्वनियोजित मार्गानुसार वाहतूक करण्यात आली.
नोडल अधिकारी प्रमोद ओंभासे आणि सहाय्यक नोडल अधिकारी सुनील पवार यांच्या समन्वयाने २७ महापालिका कर्मचारी, १२ व्हिडिओ कॅमेरामन आणि १६ सशस्त्र पोलिसांच्या उपस्थितीत संपूर्ण कामकाज पार पडले. पोलिस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार सुसज्ज स्ट्राँग रूममध्ये यंत्रांची साठवण करण्यात आली.
सीलबंद वाहनांची अधिकाऱ्यांच्या समक्ष पाहणी करूनच सील उघडण्यात आली. त्यानंतर स्ट्राँग रूम अधिकारी संजय काशिद व सत्वशील शितोळे यांच्या उपस्थितीत यंत्रे सुरक्षित ठेवण्यात आली. निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.












