- आता क्षेत्रीय कार्यालयनिहाय उजळणी…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा पत्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ डिसेंबर २०२५):- पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला. हे प्रशिक्षण चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे तीन सत्रांत घेण्यात आले.
प्रशिक्षणास उपआयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य प्रशिक्षक सतीश मेहेर, रामेश्वर पवार तसेच आयटीआयचे ईव्हीएम तज्ञ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. निवडणूक ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया असून मतदान अधिकाऱ्यांनी नियम, मार्गदर्शक सूचना आणि कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्यावर यावेळी भर देण्यात आला.
ईव्हीएम हाताळणी, मॉक पोल, मतदान साहित्य व्यवस्थापन, मतदार ओळख, सुरक्षा व्यवस्था आणि मतदानानंतरची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शंका निर्माण झाल्यास वरिष्ठांशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
पुढील टप्प्यात क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रशिक्षण घेऊन प्रत्येक केंद्रावर शांत, निर्भय आणि पारदर्शक मतदान सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.












