- दिव्यांगांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठ्या धुमधडाक्यात सुरू केलेल्या मोरवाडी येथील दिव्यांग भवनाचे अद्याप ‘फायर ऑडिट’ न झाल्यामुळे सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्वरित तपासणी करून आवश्यक सुविधा उभाराव्यात, अन्यथा दुर्घटना घडल्यास प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा अपंग सेवक संघटनेचे शहराध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी दिला आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वाकचौरे यांनी नमूद केले की, गेल्या दीड वर्षांपासून या इमारतीत कामकाज सुरू असून दररोज सुमारे २००–२५० दिव्यांग नागरिकांची ये-जा असते. तरीही सुरक्षेसाठी आवश्यक साधनसुविधा अपुऱ्या असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. सल्लागार नेमून खर्च झाला असला, तरी मूलभूत त्रुटी कायम असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
काही दिवसांपूर्वी शेजारील सिटी वन मॉलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतरही दिव्यांग भवनाचे फायर ऑडिट न होणे धोकादायक असल्याचे संघटनेचे मत आहे. आपत्कालीन प्रसंगी दिव्यांगांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी पुली लिफ्ट किंवा पर्यायी व्यवस्था नसल्याने धोका अधिक वाढल्याची नोंद निवेदनात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांच्या सुरक्षेसाठी तातडीने तपासणी, दुरुस्ती आणि आवश्यक उपकरणे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.












