- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश..
- प्रभाग २२ मधील भाजपच्या उमेदवारांचा विजय सुकर?..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०६ जानेवारी २०२६):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळेवाडीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज काळेवाडीत सभा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला असून प्रभागात नवे राजकीय संकेत दिसू लागले आहेत.
प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद जयवंत नढे, अ) निता पाडळे, ब) कोमलताई काळे आणि ड) हर्षद नढे यांच्या प्रचाराला यामुळे उभारी मिळाल्याचे स्थानिक कार्यकर्ते सांगत आहेत. संघटन बळकट झाल्याने संपर्क वाढेल आणि मतदारांपर्यंत पक्षाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार शंकरभाऊ जगताप आणि भाजप चिंचवड विधानसभा प्रभारी काळुराम बारणे यांच्या उपस्थितीत चिंचवड येथे पार पडला. या वेळी नव्या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि पक्षनिशाणी प्रदान करण्यात आली.
विनोद जयवंत नढे म्हणाले, “विश्वास, विकास आणि संघटित काम या तीन गोष्टींवर भाजपचा भर आहे. या तत्त्वांना साथ देण्यासाठी अनेक कार्यकर्ते स्वखुशीने पक्षात दाखल झाले. प्रभागातील प्रत्येक प्रश्नावर जबाबदारीने काम करून नागरिकांचा विश्वास अधिक मजबूत करू.”
भाजपमध्ये झालेल्या या प्रवेशामुळे निवडणूक प्रचाराला वेग आला असून पुढील काही दिवसांत आणखी कार्यकर्ते पक्षात येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.












