न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०६ जानेवारी २०२६):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत मतदान जनजागृती अभियानांतर्गत नागरिकांच्या सर्जनशील सहभागासाठी रील स्पर्धेसोबतच ‘मिम्स स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे.
लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, मतदानाचे महत्त्व अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी मतदानाचे महत्त्व विशद करणारी सर्जनशील रील तयार करून या स्पर्धेत सहभाग नोंदवायचा आहे.
या स्पर्धेसाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्या असून, एका प्रवेशासाठी एकाच रीलला परवानगी देण्यात आली आहे. तयार करण्यात येणारी रील राजकीय आशयविरहित असावी तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करणारी असणे आवश्यक आहे. रीलची कालावधी १५ ते ३० सेकंद इतकी असावी. रीलचा आस्पेक्ट रेशो ९:१६ असून ती MP4 फॉरमॅटमध्ये असणे बंधनकारक आहे. रीलमध्ये कोणतेही लोगो, कॉपीराइट चिन्हे किंवा अनधिकृत मजकूर वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच सर्व सहभागी नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत सोशल मीडिया पेज फॉलो करणे आवश्यक आहे.
याशिवाय मिम्स स्पर्धेसाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्या असून, एका प्रवेशासाठी एका मिम्सला परवानगी देण्यात आली आहे. तयार करण्यात येणारा मिम्स राजकीय आशयविरहित असावा तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करणारा असणे आवश्यक आहे. मिम्समध्ये कोणतेही लोगो, कॉपीराइट चिन्हे किंवा अनधिकृत मजकूर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सहभागी नागरिकांनी सर्व प्लॅटफॉर्मवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत सोशल मीडिया पेज फॉलो करणे बंधनकारक आहे.
असे व्हा स्पर्धेत सहभागी..
रील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfvu4J_kjkPlXxBG4zQJ_Z0Jl8mc9meh2ZWnXj7VdpOyiw6Nw/viewform या संकेतस्थळाला भेट द्या.
मिम्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeG2aZ3GfBAgZq4BCYMo4gNFe864k8qqgQ6WpZaKoyM2wn4Gw/viewform या संकेतस्थळाला भेट द्या.
लोकशाही अधिक सक्षम होण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग आवश्यक आहे. विशेषतः युवकांनी सर्जनशील माध्यमांचा वापर करून मतदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवावे, या उद्देशाने रील व मिम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून मतदानाबाबत सकारात्मक संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास आहे.
— तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.












