- प्रभागातील प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा केला निर्धार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०७ जानेवारी २०२६) :- महापालिकेची ही निवडणूक केवळ निवडून येणे आणि जिंकण्यापुरती मर्यादित नसून, प्रभाग आणि स्मार्ट सिटीमधील विकासातील दरी भरून काढण्याची ही मोठी संधी आहे. पाणीपुरवठा, रस्ते, सांडपाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, उद्याने आणि दिव्यांग नागरिकांसाठी सुविधा या सर्व मूलभूत प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक करू, असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक २२ च्या ‘क’ जागेवरील भाजप उमेदवार विनोद जयवंत नढे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १६ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानिमित्त काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबा नगर, नढेनगर, कोकणे नगर आणि राजवाडेनगर या प्रभागातील भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांच्यासह भाजपचे अ) पाडळे निता विलास, ब) कोमलताई सचिन काळे, ड) हर्षद सुरेश नढे यांनी मंगळवारी प्रभागातील आदर्शनगर येथे नागरीकांच्या भेटीगाठी व प्रचारावर भर दिला.
प्रचारादरम्यान नढे यांनी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकल्या. काही भागांतील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. या सर्व समस्यांची तातडीने नोंद घेत प्रशासनाकडून कामे मार्गी लावण्याची हमी त्यांनी दिली. विकास म्हणजे घोषणाबाजी नव्हे, तर कामाचा ठोस वेग आणि तोच वेग भाजप देऊ शकतो, असे सांगत नढे यांनी नागरिकांना विकासाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले.












