- सुरक्षितता, स्वच्छता आणि दर्जेदार आरोग्य सेवांसाठी कमळाला मतदान करण्याचं आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०७ जानेवारी २०२६) :- प्रभागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून महिलांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर ठोस उपाय करणे हे माझे प्राधान्य राहील, असे मत भाजपच्या प्रभाग क्रमांक २२ च्या ब जागेवरील उमेदवार कोमलताई सचिन काळे यांनी व्यक्त केले.
आदर्शनगर परिसरात झालेल्या प्रचारादरम्यान महिलांनी पाणीपुरवठा, सुरक्षा, सार्वजनिक शौचालये, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य शिबिरे वाढवण्याबाबत सूचना केल्या. कोमलताईंनी प्रत्येक मुद्द्याची नोंद घेत “महिलांसाठी सुरक्षित व सुसज्ज प्रभाग उभारू,” असा विश्वास दिला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १६ जानेवारी रोजी मतदान होत असून, भाजपचे अधिकृत उमेदवार अ) पाडळे निता विलास, क) विनोद जयवंत नढे, ड) हर्षद सुरेश नढे यांच्यासह कोमलताई सचिन काळे यांनी मंगळवारी प्रभागातील आदर्शनगर येथे नागरीकांच्या भेटीगाठी व प्रचारावर भर दिला.
भाजपाचा प्रचार घराघरांत पोहोचत आहे. भाजप सरकारच्या योजनांमुळे महिलांना स्वयंरोजगार, बचतगट, उद्यमशक्ती प्रकल्प आणि आरोग्य सुविधा मिळत आहेत, याचा आढावा नागरिकांसमोर ठेवण्यात आला.
“घर, अंगण आणि समाज तिन्ही ठिकाणी महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता राखणे हेच खरे विकासाचे मापदंड आहे,” असे म्हणत कोमलताई काळे यांनी महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.












