- माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचा रहाटणीत सोसायटीस्तरावर थेट संवाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ०९ जानेवारी २०२६) :- भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ मध्ये प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून, रहाटणी परिसरात भाजपच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विकासाभिमुख कामांचा अनुभव आणि विश्वासार्ह नेतृत्वामुळे भाजपकडे मतदारांचा कल वाढताना दिसत आहे.
भाजपचे अधिकृत उमेदवार व माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी सह उमेदवार अर्चनाताई विनोद तापकीर यांच्यासह रहाटणी, तापकीरनगर व श्रीनगर परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेतल्या तसेच प्रभागाच्या विकासासाठी पुढील पाच वर्षांचा आराखडा मांडला.
रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी आवश्यक सोयीसुविधा या मुद्द्यांवर ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “माजी नगरसेवक म्हणून केलेली विकासकामे हीच माझी ओळख आहे. पुन्हा संधी मिळाल्यास रखडलेली कामे पूर्ण करून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू,” असे नखाते म्हणाले.
सोसायटीस्तरावरील बैठकींमध्ये नागरिकांनी विविध प्रश्न मांडले असता त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विकास, पारदर्शकता आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद हे भाजपचे बलस्थान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी नागरिकांना येत्या १५ जानेवारी रोजी कमळ चिन्हावर मतदान करून भारतीय जनता पक्षाला विजयी करा, असे आवाहन केले.












