- सोसायटी स्तरावरील चर्चांमध्ये नागरिकांचा भाजपच्या विकासकामांवर विश्वास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ०९ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २७ रहाटणीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला वेग आला असून, महिला उमेदवार अर्चनाताई विनोद तापकीर यांच्या प्रचारामुळे भाजपची ताकद अधिकच वाढली आहे. रहाटणी परिसरात भाजपचा प्रचार जोमात सुरू असून, नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
अर्चनाताई विनोद तापकीर यांनी माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्यासह रहाटणी, तापकीरनगर व श्रीनगर परिसरातील सोसायट्यांमध्ये भेटी देत घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न जाणून घेतले.
महिला सक्षमीकरण, स्वच्छ व सुरक्षित परिसर, मुलांसाठी उद्याने, रस्त्यांची दुरुस्ती, पाणी व वीजपुरवठ्याच्या समस्या सोडवणे तसेच आरोग्य व शिक्षण सुविधा मजबूत करणे हे आपल्या व्हिजनचा भाग असल्याचे अर्चनाताईंनी सांगितले. “महिला प्रतिनिधी म्हणून महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रभागाचा विकास करणे हे माझे ध्येय आहे,” असे त्या म्हणाल्या.
सोसायटीस्तरावर झालेल्या चर्चांमध्ये नागरिकांनी भाजपच्या विकासकामांवर विश्वास व्यक्त केला. केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रचारादरम्यान अर्चनाताई विनोद तापकीर यांनी नागरिकांना येत्या १५ जानेवारी रोजी कमळ चिन्हावर मतदान करून भारतीय जनता पक्षाला विजयी करा, असे आवाहन केले.












