- घोषणांपेक्षा अंमलबजावणीवर भर देत सर्वसमावेशक विकासाचा संकल्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०९ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर आणि महिला उमेदवार मोनिकाताई नवनाथ नढे यांचा प्रचार अधिक जोमात सुरू आहे. दरम्यान मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी सशक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख विकासाचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. “शासकीय निधीचा योग्य वापर, नियमित जनसंपर्क आणि थेट उत्तरदायित्व” हीच आपल्या कामाची तीन प्रमुख सूत्रे असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रभाग क्रमांक २२ हा औद्योगिक, निवासी आणि व्यापारी भागांचा समतोल असलेला महत्त्वाचा प्रभाग आहे. या प्रभागात पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर वेळेत आणि ठोस उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे. केवळ आश्वासनांपुरता नव्हे तर प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देत विकासकामे केली जातील, असा विश्वास तापकीर यांनी व्यक्त केला.
“प्रभागातील प्रत्येक रुपया हा नागरिकांच्या हितासाठीच खर्च झाला पाहिजे. दर्जेदार रस्ते, विश्वासार्ह पाणीपुरवठा आणि उत्तम सार्वजनिक सुविधा या बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या तक्रारी व सूचना थेट ऐकण्यासाठी नियमित जनसंपर्क कार्यालय, वॉर्डस्तरीय बैठका आणि प्रत्यक्ष भेटी यांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
आरोग्य, शिक्षण, युवकांसाठी क्रीडा सुविधा, महिलांसाठी सुरक्षितता व स्वावलंबन तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना राबवण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वसमावेशक विकासातूनच प्रभागाचा खरा चेहरा बदलता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी निवडणुकीत अनुक्रमांक दोन समोरील ‘घड्याळ’ चिन्हावर मतदान करून मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.












