- कोमलताई सचिन काळे यांच्यासह प्रभाग २२ मध्ये उमेदवारांच्या प्रचाराला वेग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०९ जानेवारी २०२६) :-भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, नढेनगर परिसरात जोरदार गती मिळाली असून, सुशिक्षित व विकासाभिमुख पॅनलमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार कोमलताई सचिन काळे यांच्यासह माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे, उच्चशिक्षित उमेदवार हर्षद सुरेश नढे, नीता पाडळे यांच्या प्रचाराला विविध भागांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
गुरुवारी ज्योतिबानगर परिसरातील किनोलेक्स कॉलनी, गणराज कॉलनी तसेच आझाद मित्र मंडळ स्पोर्ट क्लब येथे प्रचार व नागरिकांशी थेट गाठीभेटी घेण्यात आल्या. यावेळी कोमलताई काळे यांनी महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील समस्या समजून घेतल्या. स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, महिला सुरक्षा आणि मुलांसाठी सुविधा या मुद्द्यांवर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
सायंकाळी श्री स्वामी समर्थ मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित स्वामी भक्तांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला. तसेच विजयनगर येथील शांती कॉलनीमधील इस्कॉन मंदिरातही दर्शन घेण्यात आले. विकासासोबतच सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांचे जतन करण्यावर भाजपचा भर असल्याचे कोमलताई काळे यांनी सांगितले.
दरम्यान, आज ९ जानेवारी रोजी सायंकाळी रहाटणी येथे मराठवाड्याची बुलंद तोफ पंकजाताई मुंडे यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोमलताई सचिन काळे यांनी केले आहे.












