- पारदर्शक कारभार, गुणवत्तापूर्ण कामांमुळे काळेवाडीत तरुणाईचा कल भाजपकडे?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०९ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचार अधिक प्रभावी होत असून, तरुण आणि अभ्यासू नेतृत्वामुळे भाजपच्या पॅनलला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. भाजपचे उमेदवार हर्षद सुरेश नढे यांनी गुरुवारी माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे, महिला उमेदवार कोमलताई सचिन काळे, नीता पाडळे यांच्यासह विविध भागांत प्रत्यक्ष भेटी देत प्रचार केला.
ज्योतिबानगर येथील किनोलेक्स कॉलनी, गणराज कॉलनी तसेच आझाद मित्र मंडळ स्पोर्ट क्लब येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. पायाभूत सुविधा, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, युवकांसाठी संधी आणि सुरक्षित परिसर या विषयांवर नागरिकांनी मते मांडली. हर्षद नढे यांनी विकासाला नियोजनाची जोड देत काम करण्याचा आपला निर्धार व्यक्त केला.
सायंकाळी श्री स्वामी समर्थ मंदिरात महाआरती करून प्रचाराची सांगता करण्यात आली. या वेळी स्वामी भक्तांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर विजयनगर शांती कॉलनीतील इस्कॉन मंदिरात दर्शन घेऊन शांततामय आणि सकारात्मक वातावरणात प्रचार पुढे नेण्यात आला.
“भाजप हा केवळ निवडणुकीपुरता पक्ष नाही, तर विकासासाठी सातत्याने काम करणारा पक्ष आहे,” असे हर्षद नढे यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आज ९ जानेवारी रोजी सायंकाळी रहाटणी येथे होणाऱ्या पंकजाताई मुंडे यांच्या जाहीर सभेस प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हर्षद सुरेश नढे यांनी केले आहे.












