- प्रभाग १३ मध्ये सुलभाताईंसह उमेदवारांचा वास्तववादी प्रचारावर भर..
- निगडी गावठाण, सेक्टर २२ ओटास्कीम, यमुनानगर, साईनाथनगरमधील नागरिकांचा शिवसेनेला पाठींबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १२ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेना–रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर गट) पक्षाच्या अधिकृत उमेदवार व माजी नगरसेविका सुलभाताई रामभाऊ उबाळे यांचा प्रचार अधिक जोमात सुरू आहे. नागरिकांशी थेट संवाद साधत, घराघरांत जाऊन त्या जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत.

या प्रचारात उमेदवार माजी नगरसेविका शुभांगी संजय बोऱ्हाडे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) तसेच तानाजी हिरामण शिंदे यांनीही एकत्रितपणे प्रभागाच्या विकासाचा आराखडा मांडत नागरिकांचा विश्वास संपादन केला.
सुलभाताई उबाळे म्हणाल्या की, “मी नगरसेविका असताना प्रभागातील प्रश्न प्राधान्याने सोडवले आहेत. पुढील काळातही विकास आणि सामाजिक न्याय हेच माझे ध्येय असेल. “विकास, विश्वास आणि न्याय” हाच आमचा मंत्र आहे. येत्या गुरुवारी (दि. १५) मतदानादिवशी शिवसेना–रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर गट) आघाडीच्या उमेदवारांसमोरील ‘धनुष्यबाण’ या चिन्हाला मतदान करून सर्व उमेदवारांना विजयी करा, अस आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
निगडी गावठाण, सेक्टर २२ – ओटास्कीम, यमुनानगर, साईनाथनगर या भागांत झालेल्या प्रचार फेऱ्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, तसेच महिलांशी संबंधित प्रश्न यावर नागरिकांनी थेट आपली मते मांडली.
महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. प्रचारादरम्यान “काम बोलते, शब्द नव्हे” अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.












