न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ फेब्रुवारी २०२६) :-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे तयार करून ती समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राथमिक तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
महापालिकेत सध्या कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नसताना काही अज्ञात व्यक्तींनी पालिकेच्या नावाने बनावट लेटरहेड, शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून नियुक्तीपत्रे तयार केली आहेत. या पत्रांमध्ये नियुक्तीची तारीख, पगार, महागाई भत्ता, चाचणी कालावधी, आवश्यक कागदपत्रे तसेच रुजू होण्याची तारीख आणि विभागाचे नाव नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार नियोजित रॅकेटमार्फत होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पालिकेचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी बुधवारी (दि. २५) संत तुकारानगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पालिकेची प्रतिमा मलिन होऊ नये तसेच नागरिकांची फसवणूक थांबवण्यासाठी संबंधित बनावट नियुक्तीपत्रांची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्यासाठी प्रशासन अधिकारी गोरखनाथ लिमण यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
नियुक्तीपत्राचा हा गंभीर प्रकार निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राथमिक तपासानंतर त्यांच्याकडून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– मनोज लोणकर, सहआयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका…












