- प्रशासकीय राजवटीत प्रकल्पाकडे कानाडोळा?..
- आता आर्थिक व राजकीय समीकरण जुळविण्याचा प्रयत्न?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ फेब्रुवारी २०२६) :- औंध-रावेत बीआरटी मार्गावरील रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्णत्वास आले असताना मावळ लोकसभेचे खासदार अचानक जागे झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दीड वर्षे प्रकल्प सुरू असताना कोणतीही ठोस हरकत नोंदवली नाही; मात्र उद्घाटनाच्या उंबरठ्यावर उताराचा मुद्दा पुढे करत प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्याने हा सुरक्षेचा प्रश्न की राजकीय स्टंटबाजी, असा सवाल शहरातील जाणकार नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पाहणीदरम्यान खासदारांनी उड्डाणपुलावरील तीव्र उतारामुळे भविष्यात अपघात होऊ शकतात, असा आरोप केला. पुलाची लांबी वाढवून उतार कमी करण्याचे निर्देश देत उपयोजना न करता पूल खुला केल्यास कन्सल्टंट व महापालिका अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या वक्तव्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
रक्षक चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा व वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. २२.७७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे कन्सल्टंट ‘मे. इन्फाकिंग कन्सल्टिंग इंजिनिअरिंग प्रा. लि.’ तर ठेकेदार ‘मे. टी अॅन्ड टी इन्फ्रा लिमिटेड’ आहेत. कामासाठी आतापर्यंत सुमारे ७५ टक्के रक्कम अदा करण्यात आली असून, पूर्णत्वाची मुदत ७ एप्रिल आहे.
महापालिका अधिकाऱ्यांनी मात्र आयआरसी नियमांनुसारच काम झाल्याचा दावा केला आहे. “तांत्रिक त्रुटींची शक्यता कमी आहे. तरीही आक्षेप असल्यास सीओईपीसारख्या संस्थेकडून सेफ्टी ऑडिट करून प्रकल्पाचा अभ्यास केला जाऊ शकतो. अंतिम निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील,” असे काही अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना सांगितले.
प्रशासकीय राजवटीत सुरू झालेल्या या प्रकल्पावर शेवटच्या टप्प्यात आक्षेप घेतल्याने आर्थिक व राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा खरा की श्रेयवादाचा याचे उत्तर मात्र अद्याप अनुत्तरित आहे.












