- शौर्य संचलन व त्रिशूळ दीक्षा सोहळा संपन्न..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ जानेवारी २०२६) :- ‘भारत हे हिंदुराष्ट्रच आहे!’ असे प्रतिपादन बजरंग दल प्रांत संयोजक नितीन महाजन यांनी श्री सावतामहाराज मंगल कार्यालय, राहता (शिर्डी) येथे रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी केले. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि बजरंग दल उत्तर अहिल्यानगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शौर्य संचलन व त्रिशूळ दीक्षा सोहळ्यात नितीन महाजन बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महंत आत्मारामगिरी महाराज, विश्व हिंदू परिषद – पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे, बजरंग दल प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे, विभाग मंत्री सुनील खिस्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह प्रा. दीपक जोंधळे, जिल्हा मंत्री विशाल वाकचौरे, बजरंग दल जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक, हृषीकेश भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.
नितीन महाजन पुढे म्हणाले की, ‘मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांनी या देशाच्या भूमीला मातेचे स्थान देऊन वंदनीय मानले. छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांनी जिवाची बाजी लावून स्वराज्याच्या माध्यमातून अठरापगड हिंदूंना संघटित केले. असे असूनही आपल्या देशात हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार होतात. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांची हिंदूंचे एकत्रीकरण, पालनपोषण आणि संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते अहोरात्र कार्यरत आहेत; पण देशातील समस्त हिंदू समाज जागृत झाला पाहिजे म्हणून हिंदूंनो उठा! जागृत व्हा! प्रशिक्षित व्हा! आपल्या हिंदुराष्ट्राला सक्षम करण्यासाठी संघर्ष करा!’ ॲड. सतिश गोरडे यांनी, ‘हिंदू समाजापुढील आवाहने पाहून पूजनीय गोळवळकर गुरुजी यांनी हिंदू धर्मातील सर्व संप्रदाय आणि पंथांचे पूजनीय संत व महंत यांना एकत्र करून विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली. स्थापनेपासून विश्व हिंदू परिषदेने अनेक आंदोलने यशस्वी केलीत. आजच्या घडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान याला न मानणारी पिलावळी निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण प्रखंड, उपखंड, मंडल, ग्राम स्तरावर संविधान पूजन केले पाहिजे. तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारांची माहिती आज सर्वांपुढे मांडणे गरजेचे आहे!’ असे आवाहन केले.
प्रा. दीपक जोंधळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू असून त्यानिमित्ताने गृहसंवाद अभियानात घराघरांत संघविचार पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगितले. संदेश भेगडे यांनी पाश्चात्त्य संस्कृतीचे उदात्तीकरण, लव्ह जिहाद, वाढती व्यसनाधीनता, बाहेरील अपायकारक फास्ट फूडचे वाढते सेवन याविषयी चिंता व्यक्त करून याबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राहाता येथील श्री सावतामहाराज मंगल कार्यालयापासून शौर्य संचलन करण्यात आले. त्यामध्ये भगवा ध्वज घेऊन बजरंग दलाचा गणवेश, हातात दंड, हनुमानाची भव्य गदा घेऊन बजरंगींचे शिस्तबद्ध पद्धतीने संचलन राहाता शहरातील प्रमुख मार्गांवरून जाताना शहरातील नागरिक, माताभगिनी यांनी पुष्पवृष्टी करून, रांगोळी काढून भव्य स्वागत केले. ग्रामदैवत वीरभद्र महाराज यांच्या मंदिरासमोर सर्व नगरसेवकांनी व नागरिकांनी पुष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत केले. यावेळी राहाता नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, तसेच श्रीरामपूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक अर्जुन दाभाडे, नेवासा येथील कृष्णा परदेशी यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. जिल्हा सह मंत्री गोपाळ राठी, योगेश मखाना, प्रशांत बेल्हेकर, प्रशांत बहिरट, साई पानसरे, शुभम साबदे, आर्यन शिंदे, नवनाथ मुर्तडक, विठ्ठल रोडे, हेमंत बंड आणि मंदार जोशी यांनी संयोजन केले. कान्हा मखाना यांनी सूत्रसंचालन केले.












