- शपथ, पथनाट्याद्वारे मतदानाचा जागर…
- निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देखील केले सफाई सेवकांना मार्गदर्शन….
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदान जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत निगडी सेक्टर २६ येथील डॉ. हेडगेवार भवन येथे सफाई सेवकांसाठी विशेष मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या सफाई सेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत मतदानाची शपथ घेत लोकशाहीप्रती आपली कटिबद्धता व्यक्त केली.
उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाडगे यांच्यासह महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निवेदिता घार्गे, अविनाश डोईफोडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक दत्तात्रय गणगे, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, विकास शिंदे यांच्यासह सफाई सेवक व नागरिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या, स्वीप अंतर्गत शहरामध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आज सफाई सेवकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला सफाई सेवकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद समाधानकारक आहे. स्वच्छतेप्रमाणेच लोकशाहीही टिकवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असून, प्रत्येकाने निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी पल्लवी घाडगे म्हणाल्या, लोकशाही टिकवण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा मतदानातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणारे सफाई सेवक हे समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांनी मतदानाची शपथ घेऊन लोकशाहीप्रती दाखवलेली बांधिलकी प्रेरणादायी आहे. येत्या निवडणुकीत प्रत्येक सफाई सेवकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.
मतदान जनजागृतीसाठी यावेळी पथनाट्याचे सादरीकरण माणिक खटींग, नीलम वाघमारे, अनिकेत शिंदे, शिवप्रसाद पासलकर या कलाकारांनी केले. या पथनाट्याच्या माध्यमातून मतदान न केल्याचे दुष्परिणाम आणि प्रत्येक मताचे लोकशाहीतील महत्त्व अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.












