- काळेवाडी मच्छिंद्र तात्या तापकीरांनी शेवटच्या फेरीपर्यंत भाजपला घाम फोडला..
- मतमोजणीत प्रत्येक फेरीत तापकीर विरुद्ध नढे ‘हाय व्होल्टेज ड्रामा’…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जानेवारी २०२६) :- महानगरपालिका निवडणुकीत काळेवाडी प्रभागात तीन जागांवर भाजप तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली असली, तरी या निकालात सर्वाधिक चर्चा ‘ड’ गटातील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस या थेट लढतीची होत आहे.
भाजपचे उमेदवार विनोद नढे विजयी ठरले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र तापकीर यांनी शेवटच्या फेरीपर्यंत दिलेल्या कडव्या झुंजीमुळे संपूर्ण प्रभागात राजकीय वातावरण तापलेले दिसून आले. त्यामुळेच “उनकी जीत से ज्यादा; हमारी हार के चर्चे!” अशी भावना सर्वत्र उमटताना दिसत आहे.
माजी नगरसेवक तसेच माजी विरोधी पक्षनेते असलेल्या मच्छिंद्र तापकीर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात उमेदवारी जाहीर केली. ऐनवेळी उमेदवारी मिळूनही तापकीर यांनी प्रचारात आक्रमक भूमिका घेत भाजपच्या विद्यमान नगरसेवक आणि उमेदवार विनोद नढे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले. तुल्यबळ उमेदवार असल्याने ही लढत अटीतटीची ठरणार, याचे संकेत प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात मिळाले होते.
मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत दोन्ही उमेदवारांमध्ये मताधिक्याचा चढ-उतार पाहायला मिळाला. सुरुवातीपासूनच शेकड्यांत फिरणारे मतांचे अंतर, शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिल्याने भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही गोटांत प्रचंड अस्वस्थता होती. प्रत्येक मत मोलाचे ठरत असताना शेवटच्या फेरीत भाजपचे उमेदवार विनोद नढे यांनी आघाडी घेतली आणि अखेर अवघ्या १३०० मतांच्या फरकाने मच्छिंद्र तापकीर यांचा विजय निसटला.
हा फरक आकड्यांमध्ये कमी असला, तरी त्याचे राजकीय अर्थ मोठे मानले जात आहेत. अनेक राजकीय अभ्यासक आणि स्थानिक मतदारांच्या मते, हा निकाल भाजपसाठी इशारा तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी आगामी काळातील संधीचा स्पष्ट संकेत आहे. दीर्घकाळ सत्तेत असलेल्या भाजपला या प्रभागात इतक्या चुरशीच्या लढतीला सामोरे जावे लागणे, ही बाब पक्षासाठी आत्मपरीक्षणाची असल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीत मच्छिंद्र तापकीर यांनी स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न, अपूर्ण विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव यावर आक्रमकपणे बोट ठेवले. त्यांच्या प्रचाराला तरुण, महिला तसेच स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. निकाल जाहीर झाल्यानंतरही “तापकीर हरले असले, तरी त्यांनी मनं जिंकली,” अशी चर्चा प्रभागात रंगताना दिसत आहे. काळेवाडीच्या राजकारणात ही लढत पुढील निवडणुकांसाठी दिशा ठरवणारी ठरेल, हे मात्र निश्चित.












