अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी शहरभर व्यापक व नियोजनबद्ध तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे विविध अभिनव व परिणामकारक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमांतर्गत शहरातील कचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करणे, नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा विलगीकरणाची सवय रुजवणे, घरगुती पातळीवर होम कंपोस्टिंगचा प्रसार करणे तसेच आर.आर.आर. सेंटर्सचा विस्तार करणे यावर विशेष भर देण्यात येत आहे. यासोबतच शहरातील विविध भागांत शून्य कचरा प्रकल्प प्रभावीपणे राबवून कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आरोग्य विभागाकडून नागरिक, गृहनिर्माण संस्था, व्यापारी आस्थापना, शाळा व महाविद्यालये यांना सहभागी करून जनजागृती मोहिमा, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, मार्गदर्शन सत्रे व पाहणी दौरे आयोजित करण्यात येत आहेत. कचरा विलगीकरण न करणाऱ्या ठिकाणी समुपदेशन करण्यात येत असून, नियमांचे पालन करणाऱ्या नागरिक व संस्थांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२६ मध्ये शहराचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, यंत्रसामग्रीचा वापर, तांत्रिक सुधारणा आणि सातत्यपूर्ण देखरेख यावरही भर देण्यात येत आहे. स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास साधणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.












