- येत्या गुरुवारी होणार आरक्षणाचा फैसला…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (दि. १६) जानेवारीला लागला. तीन दिवस उलटूनदेखील महापौर पदासाठी कोणते आरक्षण पडणार आणि महापौरपदी कोण विराजमान होणार याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.
दरम्यान आता २२ जानेवारीला मुंबईत नगरविकास विभाग राज्यातील सर्वच महापालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण काढणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी कोणते आरक्षण पडणार याचा फैसला गुरुवारी होणार आहे. त्यानंतरच पिंपरी चिंचवड महापलिकेच्या महापौरपदी कोणत्या नगरसेवकाची वर्णी लागेल, याचा ‘सस्पेन्स’ संपेल. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून ऐंशीपेक्षा अधिक नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपचाच महापौर होणार आहे.
महापौर पदाच्या आरक्षणाबाबत आवश्यक असलेली सर्व माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सप्टेंबर २०२५ मध्येच राज्य शासनाकडे सादर केली होती. यामध्ये शहराची लोकसंख्या, आजपर्यंत लागू झालेल्या महापौर आरक्षणाचा प्रवर्ग, कालावधी तसेच आरक्षण संपुष्टात येण्याचा तपशील समाविष्ट होता. २०११ च्या जनगणनेनुसारची माहितीही शासनाला पाठविण्यात आली आहे.
आतापर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गातील नगरसेवकांना संधी मिळाली आहे. मात्र, अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी महापौरपदाचे आरक्षण अद्याप लागू झालेले नाही, याकडे राजकीय अभ्यासकांचे लक्ष आहे.












