- प्रभाग २८ मध्ये अनिताताई संदीप काटेंचा दणदणीत विजय..
- हाय व्होल्टेज लढतीत माजी नगरसेविका शीतल काटेंचा पराभव…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पिंपळे सौदागर येथील प्रभाग क्रमांक २८ मध्ये मतदारांनी स्पष्ट संदेश देत घराणेशाहीला नकार दिला. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना काटे यांच्या पत्नी व माजी नगरसेविका शीतल काटे यांचा राजकारणात नवख्या असलेल्या अनिताताई संदीप काटे यांनी पंधराशेपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.
ही लढत अत्यंत चुरशीची व हाय व्होल्टेज ठरली. २०१७ च्या निवडणुकीत शीतल काटे या प्रभाग २८ मधून नगरसेविकापदी निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांचे पती नाना काटे प्रभागात अधिक सक्रिय असल्याने शीतल काटे स्वतः फारशा सक्रिय दिसल्या नसल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीत “काम करणारी नगरसेविका हवी, घरात बसणारी नको” अशी चर्चा मतदारांमध्ये जोर धरू लागली होती.
दरम्यान, अनिता काटे यांचे पती संदीप काटे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानत ‘बदल हवा नवा’ या घोषवाक्याखाली जोरदार तयारी केली. घराघरांत जाऊन संपर्क, स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका आणि नव्या नेतृत्वाचा आश्वासक दृष्टिकोन यामुळे अनिता काटे यांना मतदारांचा व्यापक पाठिंबा मिळाला.
अटीतटीच्या या सामन्यात अखेर प्रभागातील मतदारांनी अनिता काटे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. या निकालाने पिंपळे सौदागरमध्ये कामगिरी, बदल आणि जबाबदारी यांना प्राधान्य देणारा जनमताचा कौल स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे.












