न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जानेवारी २०२६) :- चिंचवडच्या दत्तनगर परिसरात तिघांवर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याची घटना घडली आहे. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार शनिवार (दि. १७) रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास बुध्द विहारच्या समोर घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फिर्यादी हा त्याच्या दुचाकीवरून दोघांना घेऊन जात होता. मध्येच आरोपी तिघाजणांनी त्यांची गाडी फिर्यादीच्या गाडीला आडवी लावून ‘माझ्याकडे रागाने का बघतोस’, असे म्हणत फिर्यादीच्या गाडीवर लोखंडी कोयता मारून नुकसान केले. तसेच त्यांच्यातील एका जणाने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडावर, पोटरीवर मारुन त्याला जखमी केले. फिर्यादीचा भाऊ यास आरोपी २ याने लोखंडी कोयता मारला. फिर्यादीचा मित्र यास आरोपी ३ यांने लोखंडी कोयत्याने मारुन जखमी केले आहे, असं फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी फिर्यादी बसवराज हेळवार (वय २१ वर्षे, रा. चिंचवड) याने आरोपी १) आनंद कांबळे (वय १९ वर्षे), २) अर्जुन पात्रे (वय अंदाजे २६ वर्षे), ३) आशिष गवारी (वय अंदाजे २२ वर्षे, रा. वाल्हेकरवाडी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांकडून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास पोउपनि वारे हे करीत आहेत.












