- नवनिर्वाचित नगरसेविका अर्चना विनोद तापकीर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव..
- प्रभाग क्रमांक २७ ‘रहाटणी’ला विकासाचा रोल मॉडेल बनविण्याचा केला निर्धार…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यंदा अनेक अनपेक्षित निकालांनी नागरिकांना अचंबित केले. काही उमेदवारांची स्वप्ने अपुरी राहिली, तर अनेकांची स्वप्ने प्रत्यक्षात साकार झाली. समाजसेवेच्या कष्टाचे फळ विजयाच्या रूपात मिळालेल्या उमेदवारांपैकी एक ठळक नाव म्हणजे अर्चना विनोद तापकीर.

प्रभाग क्रमांक २७ रहाटणी येथून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या अर्चना विनोद तापकीर यांच्या विजयाबद्दल सध्या त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच मतदारसंघातील नागरिक त्यांचे अभिनंदन करत आहेत.
अर्चना तापकीर यांचे पती विनोद तापकीर हे अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीत सक्रिय असून आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली काळेवाडी-रहाटणी परिसरात सातत्याने समाजसेवेची कामे करत आहेत. नागरिकांच्या समस्या स्वतःच्या समस्या समजून त्या सोडवण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. त्यामुळेच नागरिक त्यांच्याकडे भावी लोकप्रतिनिधी म्हणून पाहत होते.
पक्षाने त्यांच्या पक्षनिष्ठा व कामाची दखल घेत त्यांना यापूर्वी स्वीकृत नगरसदस्य म्हणून संधी दिली होती. त्या संधीचे त्यांनी सोने केले. त्यांच्या या कार्यात त्यांच्या अर्धांगिनी अर्चना तापकीर यांनी नेहमीच खंबीर साथ दिली. अखेर पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत प्रभाग क्रमांक २७ मधून उमेदवारी दिली आणि जनतेनेही त्यांना नगरसेविका म्हणून निवडून दिले.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना अर्चना विनोद तापकीर म्हणाल्या की, “नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही. प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र एक करून काम करू. प्रभाग क्रमांक २७ रहाटणी हा विकासाचा रोल मॉडेल म्हणून संपूर्ण शहरासमोर उभा करू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.












