- औद्योगिक – सांस्कृतिक नगरी आता होणार ‘स्पोर्ट्स हब’!…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०९ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड ही केवळ औद्योगिक आणि सांस्कृतिक नगरीच नाही, तर आता ती जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणारी ‘क्रीडा पंढरी’ म्हणून ओळखली जावी, या उद्देशाने आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील रिक्त असलेल्या महानगरपालिकेच्या भूखंडांवर ‘आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’ उभारण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असा औचित्याचा मुद्दा आमदार अमित गोरखे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला.
पिंपरी-चिंचवडच्या मध्यवर्ती स्थानाचा फायदा.
आपली भूमिका मांडताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहर हे मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांच्या मध्यभागी असून अत्यंत वेगाने विकसित होत आहे. शहरात रेल्वे, मेट्रो आणि रस्ते वाहतुकीचे उत्तम जाळे उपलब्ध आहे. प्रशासन आणि दळणवळणाची सर्व केंद्रे शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही हे शहर अग्रेसर असून लाखो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. अशा वेळी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यालगत असलेले महानगरपालिकेचे रिक्त भूखंड क्रीडा विद्यापीठासाठी अत्यंत योग्य आणि सर्वसमावेशक आहेत.
भविष्यातील ऑलिम्पिक खेळाडूंचे केंद्र.
जर या रिक्त भूखंडांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ उभारले, तर केवळ राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी मोलाचे योगदान देणारे खेळाडू येथून घडतील. जागतिक दर्जाच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक प्रतिभेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळेल, असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला.
दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू.
आमदार अमित गोरखे यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून गेल्या दोन महिन्यांपासून शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मी दोन महिन्यांपूर्वीच ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष पत्राद्वारे या संदर्भात पत्रव्यवहार करून मागणी केली होती. आज सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी पुन्हा सरकारचे लक्ष वेधले असून, सरकारने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आमदार अमित गोरखे यांनी नमूद केले.
शहराच्या वैभवात भर पडणार.
औद्योगिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराला आता ‘स्पोर्ट्स हब’ म्हणून विकसित करण्यासाठी हे क्रीडा विद्यापीठ मैलाचा दगड ठरेल. आमदार अमित गोरखे यांच्या या मागणीमुळे क्रीडा प्रेमी आणि तरुण खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.












