- भाजप राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता?..
- राजकीय वर्तुळात खळबळ…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने (भाजप) एकहाती सत्ता स्थापन केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपाने तब्बल ८५ जागांवर दणदणीत विजय मिळवत महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गतवेळच्या तुलनेत ३६ जागा राखण्यात यश आले असून, भाजपापाठोपाठ राष्ट्रवादी ही दुसऱ्या क्रमांकाची ताकद ठरली आहे.
या निकालानंतर शहराच्या राजकारणात नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थेट विरोधी बाकावर बसावे लागणार की राज्यातील सत्तेसारखीच महायुतीची समीकरणे शहरातही आकार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत असताना, त्याचे प्रतिबिंब महापालिकेतही दिसणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपली ‘राजकीय जादूची कांडी’ फिरवून नवे समीकरण घडवू शकतात, असा अंदाज सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत अनिश्चितता कायम आहे.
एकीकडे भाजपाने महापौर तसेच स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींमध्येही पडद्यामागील हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगामी काही दिवसांत पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











