- ‘हा गुलाल माझ्या विजयाचा नसून; पिंपळे सौदागरवासीयांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचा आणि जबाबदारीचा’ – नवनिर्वाचित नगरसेविका कुंदाताई संजय भिसे…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० जानेवारी २०२६) :- “पिंपळे सौदागर, रहाटणी प्रभागातील मतदार बांधवांनी माझ्या पारड्यात १७७८४ मतांचे दान टाकले व ‘न भूतो न भविष्यती’ असे ७१६२ अशा प्रचंड मताधिक्याने मला विजयी केले. परंतु मला जाणीव आहे की हा गुलाल माझ्या विजयाचा नसून; पिंपळे सौदागरवासीयांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचा आणि जबाबदारीचा आहे”, अशा भावनिक शब्दांत नवनिर्वाचित नगरसेविका कुंदाताई संजय भिसे यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले.
पिंपळे सौदागर, रहाटणी प्रभाग २८ मधील नागरिकांनी दिलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे नगरसेविका म्हणून निवड झाल्यानंतर कुंदाताई भिसे यांनी जनतेशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, “हा विजय माझा वैयक्तिक नसून पिंपळे सौदागर, रहाटणी प्रभागामधील प्रत्येक कुटुंबाचा आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास हा केवळ सन्मान नाही, तर माझ्यावर सोपवलेली मोठी जबाबदारी आहे. या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.”
निवडणूक काळात नागरिकांनी दिलेले प्रेम, कार्यकत्यांनी केलेली अथक मेहनत, तसेच ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि महिलांची भक्कम साथ यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. “लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आणि ज्येष्ठांसह तरुणांच्या ऊर्जेने ही लढाई यशस्वी झाली. प्रत्येक मतदार बांधव हा माझ्यासाठी कुटुंबातील सदस्यासारखा माझ्या पाठीशी उभा राहिला,” असे कुंदाताई भिसे म्हणाल्या.
पिंपळे सौदागरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, परिसरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल. नागरिकांच्या समस्या ऐकून तत्काळ आणि पारदर्शक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
“तुम्ही माझ्यावर टाकलेला विश्वास हा माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. हा गुलाल विजयाचा नसून, जबाबदारीचा आहे. या जबाबदारीला न्याय देण्यासाठी मी प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थपणे काम करेन,” असे सांगत कुंदाताई भिसे यांनी पुन्हा एकदा पिंपळे सौदागरवासीयांचे मनःपूर्वक आभार मानले.











