- या दिवशी होणार कार्यमुक्त…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी वैद्यकीय कारणास्तव स्वेच्छानिवृत्तीसाठी केलेल्या अर्जास महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यांनी २८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रशासन विभागाकडे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला होता. या अर्जास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकृत मंजुरी दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या निर्णयानुसार मकरंद निकम यांना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवेतून कार्यमुक्त करण्यात येणार आहे. निकम यांनी १ ऑगस्ट १९८८ रोजी महापालिका सेवेत प्रवेश केला होता. तब्बल साडेतीन दशकांच्या सेवाकाळात त्यांनी महापालिकेच्या विविध विभागांत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. शहर विकास, पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी प्रकल्पांची अंमलबजावणी तसेच देखरेखीच्या कामात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे.
मकरंद निकम यांची १ जून २०२२ रोजी शहर अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी ते बांधकाम परवानगी विभागात शहर अभियंता पदावर कार्यरत होते. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी २६ मे २०२२ रोजी त्यांना शहर अभियंता पदोन्नती दिली होती. त्यांच्या अनुभवाचा लाभ महापालिकेच्या अनेक विकासकामांना झाला आहे.
त्यांच्या सेवानिवृत्तीला अंदाजे दीड ते दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांनी अचानक निवृत्तीची इच्छा व्यक्त केल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, महापालिकेत शहर अभियंता पदाच्या समकक्ष दोन मुख्य अभियंता पदे निर्माण करण्यात आली असून, त्यावर संजय कुलकर्णी आणि प्रमोद ओंभासे कार्यरत आहेत. लवकरच नव्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.












