- मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (दि. २१ जानेवारी २०२६) :- आमदार शंकर जगताप यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरवमध्ये भारतीय जनता पक्षाने चारही गटांत विजय मिळवला असला, तरी या निकालावर ‘नोटा’ने टाकलेली सावली दुर्लक्षित करता येणार नाही. तब्बल ६,६६४ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडत सत्ताधाऱ्यांबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. हा आकडा म्हणजे विजयाचा जल्लोष फिकट करणारा आणि राजकीय आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारा इशारा आहे.
विशेषतः अ गटात २,२६९ आणि ब गटात २,३८२ मते ‘नोटा’ला मिळणे हे धक्कादायक आहे. थेट द्विपक्षीय लढती असूनही हजारो मतदारांनी कोणत्याही उमेदवारावर विश्वास न दाखवणे हे स्थानिक नेतृत्वाच्या अपयशाचे द्योतक मानले जात आहे. क गटात १,०४६ तर ड गटात २६७ मते ‘नोटा’ला मिळाली, ही बाबही मतदारांचा असंतोष व्यापक असल्याचे दर्शवते.
महापालिका निवडणुकीत एकूण ६१२ उमेदवार रिंगणात असताना तब्बल १ लाख १० हजार मतदारांनी “एकही उमेदवार विश्वासू नाही” असा स्पष्ट कौल दिला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील विसंगत राजकीय समीकरणे, संधीसाधूपणा आणि स्थानिक प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे मतदारांचा कल ‘नोटा’कडे वळल्याचे बोलले जात आहे. हा कल केवळ निषेध नाही, तर येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांसाठी गंभीर डोकेदुखी ठरणारा इशारा आहे.












