- कृतीतून विश्वास जपणाऱ्या अर्चना विनोद तापकीर यांचा प्रभाग २७ मधून दणदणीत विजय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २७ मधील निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे शांत, संयमी आणि सातत्यपूर्ण काम करणाऱ्या नेतृत्वावर आजही जनतेचा ठाम विश्वास आहे. शब्दांपेक्षा कृतीवर भर देणाऱ्या भाजपच्या अर्चना विनोद तापकीर यांना नागरिकांनी स्पष्ट कौल देत निवडून दिले आहे.
राजकारणाला केवळ सत्तेचे साधन न मानता लोकसेवेचे माध्यम मानणारी त्यांची भूमिका त्यांच्या संपूर्ण वाटचालीत दिसून येते. पक्षनिष्ठा, वैचारिक ठामपणा आणि संघटनात्मक शिस्त या मूल्यांशी तडजोड न करता त्यांनी आपला राजकीय प्रवास घडवला आहे. सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या कुटुंबाची पार्श्वभूमी लाभल्यामुळे सेवाभाव आणि जबाबदारीची जाणीव त्यांच्या स्वभावातच रुजलेली आहे.
मोठ्या आवाजात बोलण्याऐवजी शांतपणे काम करणे, प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष परिणामांवर विश्वास ठेवणे ही त्यांची ओळख राहिली आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता तसेच पायाभूत सुविधा या विषयांवर त्यांनी कायम ठोस आणि सकारात्मक भूमिका घेतली. प्रचाराच्या काळातही त्यांनी संयम राखत थेट संवादातून नागरिकांशी विश्वासाचे नाते अधिक घट्ट केले.
या विश्वासाचीच पावती म्हणजे प्रभाग २७ मधून मिळालेला विजय. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून शांत, सेवाभावी आणि परिणामकारक नेतृत्वाच्या विचारधारेचा असल्याची भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.














