- प्रजासत्ताक दिनानिमित्त इतिहास व मनोरंजनाचा अनोखा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ जानेवारी २०२६) :- निगडी येथील अप्पू घर मनोरंजन केंद्रामध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २४ ते २६ जानेवारी दरम्यान ‘स्वराज्य की लढाई’ हा माहितीपट मोफत दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती अप्पू घरचे मुख्य संचालक डॉ. राजेश मेहता यांनी दिली.
या सुमारे ३० मिनिटांच्या माहितीपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य, स्वराज्याची स्थापना तसेच प्रमुख किल्ल्यांवरील ऐतिहासिक माहिती मांडण्यात आली आहे. हा माहितीपट अप्पू घर येथील मिनी थिएटरमध्ये दाखविण्यात येणार असून, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोणत्याही वयोगटातील नागरिकांकडून यासाठी शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, अप्पू घरमध्ये प्रवेशासाठी नियमित प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे.
डॉ. मेहता यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून संविधान, इतिहास आणि स्वराज्याच्या मूल्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. मनोरंजनासोबत शिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गेली ३५ वर्षांहून अधिक काळ अप्पू घर हे पिंपरी-चिंचवड, पुणे व संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांचे विश्वासार्ह मनोरंजन केंद्र म्हणून ओळखले जाते.
दरम्यान, व्यवस्थापक धम्मपाल वाघमारे यांनी सांगितले की, सध्या या माहितीपटासाठी प्रति व्यक्ती ६० रुपये शुल्क आकारले जाते. मात्र २४ ते २६ जानेवारीदरम्यान हा माहितीपट पूर्णतः मोफत असणार आहे. तसेच, येणाऱ्या पर्यटकांसाठी तात्पुरत्या टॅटू पेंटिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून, मुलांसह कुटुंबीयांसाठी हे विशेष आकर्षण ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी व्यवस्थापक धम्मपाल वाघमारे (मो. ९९२३९७७४५०) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.














