- हभप बंडातात्या कराडकर यांच प्रतिपादन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ जानेवारी २०२६) :- मावळच्या माती प्रमाणेच इथली माणसे जशी लढवय्ये आहेत तशीच मवाळ देखील आहेत. संत तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या मावळ परिसरातील या सर्व लढवय्या व मवाळ माणसांनी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या माध्यमातून पुणे जिल्हयातील सर्वांनाच सोबत घेऊन अयोध्या मधील प्रभू श्री रामाच्या मंदिरा प्रमाणेच श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या मंदिर निर्माणाचे काम गेली सहा वर्षांपूर्वी सुरु केले. वारकरी संप्रदाय व संपूर्ण महाराष्ट्रालाच भूषण वाटावे असे तुकोबारायांचे भव्य-दिव्य मंदिर उभे राहत आहे व यासाठी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, फडकरी मंडळी व भाविकजनांच्या देणगीतून या मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या वर्षभरात ते पूर्ण व्हावे व भव्य-दिव्य स्वरुपात या मंदिराचा लोकार्पण सोहळा व्हावा असा मानस वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिन माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने वारकरी रत्न छोटे माऊली महाराज कदम यांच्या पुढाकाराने व नेतृत्वाने श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या १०० एकर परिसरात श्रीक्षेत्र देहू व श्रीक्षेत्र आळंदी संस्थांनच्या सहकार्याने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टने आयोजित केलेल्या अखंड हरीनाम सप्ताहात हभप बंडातात्या कराडकर यांची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा संपन्न झाली. संत तुकोबारायांचे शिष्य श्री रामेश्वर भट यांच्या
तुकाराम तूकाराम | नाम घेता कापे यम || धन्य तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ || या अभंगावर निरुपण करीत तुकोबारायांनी आपल्या इहलोकीच्या जीवनात साधलेला पुरुषार्थ याचे अनेक अभंगातून दाखले देत बंडातात्यांनी आपली कीर्तन सेवा तुकोबारायांच्या चरणी रुजू केली.
संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा, संत नामदेव महाराज व संत जनाबाई षष्ठशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा, संत सावता माळी ६३० वी जयंती व तपोनिघी नारायण महाराज त्रिशतकोत्तर प्राकट्या वर्षानिमित्ताने आयोजित कीर्तन महोत्सवात तुकोबारायांच्या बीज सोहळ्या नंतर अवघ्या ७ महिन्यात या दुसरा भव्य सोहळयासाठी पुढाकार घेतल्या बद्दल वारकरी रत्न छोटे माऊली महाराज कदम यांचे हभप बंडातात्या कराडकर यांनी कौतुक केले व पुढील वर्षी मंदिर लोकार्पण सोहळ्यात देखील छोटे माऊली कदम महाराजांनी तिसरा भव्य-दिव्य सोहळा येथेच आयोजित करावा अशी भावना व्यक्त केली. या कीर्तन प्रसंगी पुणे जिल्हयातील अनेक मान्यवर, श्रीक्षेत्र भंडार डोंगर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व हजारो भाविक उपस्थित होते.
















