न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २४ जानेवारी २०२६) :- सौभाग्याचे प्रतिक असलेल्या हळदी – कुंकवासह वाणांची देवाण घेवाण , मजेशीर उखाणे, पुरुषांसाठी तिळगुळाचे वाटप आणि जोडीला अवीट गोडी असलेल्या गीतांच्या श्रवणानंदाने पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनच्या कार्यक्रमाचा गोडवा उत्तरोत्तर वाढत गेला.
मकर संक्रांत आणि वसंत पंचमी निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी स्व. बाळासाहेब कुंजीर क्रिडांगणावर झालेल्या या कार्यक्रमास प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे, अनिता काटे आणि सपना काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या तिघींनी मकर संक्रांती निमित्ताने उपस्थित महिलांसमोर मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या तसेच प्रभागातील विकासकामांसाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पुजनाने करण्यात आला. हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपासोबतच या कार्यक्रमात सुरेखा पाटील, नीता गुप्ता, शोभा पोरवाल, मीनल जोशी, रेखा सहाय, रेखा देवपूरकर यांनी अवीट गोडीची मराठी – हिंदी गाणी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शकुंतला शिंदे यांनी केले. मकर संक्रांत सणाची माहिती, उत्तरायणातील आहार – विहार तसेच वसंत पंचमी याबाबतची माहिती शोभा राजगुरे, निर्मला कासार आणि भामिनी महाले यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष पवार तसेच सखाराम ढाकणे, विवेकानंद लिगाडे, दिलिप चौगुले, अनिलकुमार शाह, जयपाल सिदनाळे, अशोक येळंमकर, अनिल कुलकर्णी, रमेश चांडगे, अशोक कलाल, विमल मोंढेकर या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. भामिनी महाले यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
















