- राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची कसोटी..
- भाजपविरोधात स्व. दत्ता सानेंसारख्या आक्रमक चेहऱ्याची आज राष्ट्रवादीला खरी गरज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने ८५ जागा मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. सत्तेची सूत्रे भाजपकडे असली तरी, महापालिकेतील राजकारणाची दिशा आता विरोधी बाकावर बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. ३७ नगरसेवकांसह राष्ट्रवादी हा सभागृहातील सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला असून, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची निवड निर्णायक ठरणार आहे.
निवडणूक प्रचाराच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचार, गैरकारभार आणि महापालिकेच्या आर्थिक बोजावरून आक्रमक हल्ले चढवले होते. मात्र या आरोपांना शहरपातळीवर प्रभावीपणे पुढे नेणारे नेतृत्व समोर येऊ शकले नाही. याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेतेपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजपचे वाढते संख्याबळ, राष्ट्रवादीची घटती धार…
भाजपमध्ये राष्ट्रवादीतून गेलेल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमुळे सत्ताधारी पक्ष अधिक बळकट झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडे ठाम, आक्रमक आणि जनतेत विश्वास निर्माण करणारे चेहरे मर्यादित असल्याचे दिसून येते. शहराध्यक्ष योगेश बहल, विलास लांडे, अजित गव्हाणे, नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांच्याकडून अपेक्षित आंदोलनात्मक नेतृत्व उभे राहू शकलेले नाही. विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनाही शहरात प्रभावी राजकीय दिशा देता आलेली नाही, अशी चर्चा आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी कोण?..
महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सध्या संदीप वाघेरे, भाऊसाहेब भोईर, पंकज भालेकर, राहुल भोसले, वैशाली घोडेकर, माया बारणे आणि शेखर चिंचवडे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र यापैकी कोण भाजपच्या सत्तेला थेट आव्हान देऊ शकतो, हा खरा प्रश्न आहे. २०१७ मध्ये भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करणाऱ्या आणि प्रश्नांची राळ उठविणाऱ्या स्व. दत्ता सानेंसारख्या आक्रमक चेहऱ्याची खरी गरज आज पक्षाला भासणार आहे.
सभागृह आणि रस्त्यावरील लढा अपरिहार्य..
पाणीपुरवठ्याचे प्रश्न, विकास आराखडा रद्द करणे, महापालिकेतील कथित भ्रष्टाचार, वाढते कर्ज आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या या मुद्द्यांवर राष्ट्रवादीला केवळ सभागृहातच नव्हे, तर रस्त्यावरही संघर्ष उभा करावा लागणार आहे. यासाठी जनाधार असलेला आणि सामान्यांचा आवाज बनू शकणारा नेता विरोधी पक्षनेतेपदी देणे अपरिहार्य ठरणार आहे.
चुकीची निवड ठरू शकते घातक…
राष्ट्रवादीतील काही नगरसेवक नवखे आहेत, काही मवाळ भूमिका घेणारे आहेत, तर काही भाजपशी जुळवून घेण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत जर विरोधी पक्षनेतेपदासाठी सौम्य धोरण स्वीकारणारा चेहरा निवडला गेला, तर शहरातील राष्ट्रवादीचे राजकीय अस्तित्व आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांचा निर्णय ठरणार निर्णायक…
महापालिकेतील पुढील अडीच वर्षांचे राजकारण राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचे असणार आहे. भाजपविरोधात ठाम भूमिका घेणारे नेतृत्व उभे राहते की नाही, हे विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवर अवलंबून आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अजित पवार कोणावर विश्वास टाकतात, आणि भाजपविरोधातील लढ्याची धुरा कोणाच्या हाती देतात, याकडे लागले आहे.
















