- पहिल्याच दिवशी सर्वसाधारण सभा..
- महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा नवा महापौर गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारणार असून, त्याच दिवशी महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशामुळे महापौर निवड प्रक्रियेला गती मिळाली असून, दुसरीकडे राजकीय पातळीवर महापौरपदासाठीची चुरस अधिक तीव्र झाली आहे. महापौरपदाचा मान नेमका कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
विभागीय आयुक्तांनी शुक्रवारी (दि. २३) महापौर निवड प्रक्रियेबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मंगळवारी (दि. २७) महापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, मतदानाचा वेळ आणि निकाल जाहीर करण्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक नमूद करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसचिव मुकेश कोळप यांनी दिली.
महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपमधील इच्छुकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून, पक्षांतर्गत गटबाजी, प्रादेशिक समतोल तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय समीकरणे या निवडीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कोणत्या प्रभागाला महापौरपदाची संधी द्यावी, याबाबत भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, शहरातील विविध गटांकडून वरिष्ठ नेत्यांकडे लॉबिंग सुरू झाले असून, दिल्ली आणि मुंबई पातळीवरील राजकीय हालचालींचा महापौर निवडीवर प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमहापौर पद, स्थायी समितीचे पदाधिकारी तसेच विविध विषय समित्यांच्या अध्यक्षपदांची जुळवाजुळवही महापौर निवडीशी जोडली जाणार असल्याने राजकीय गणिते अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत.
महापालिकेतील सत्तासूत्रे आणि पुढील अडीच वर्षांचा कारभार लक्षात घेता, महापौरपदाची निवड केवळ औपचारिक न राहता राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
















