मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ जानेवारी २०२६) :- भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी उपस्थितांना तसेच शहरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, ‘भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीस ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस आपल्या लोकशाही परंपरेचा, संविधानिक मूल्यांचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या सातत्यपूर्ण प्रवासाचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक आणि गौरवपूर्ण प्रसंगी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मी सर्व शहरवासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देतो.’
या राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्य मंदार देशपांडे,नगरसदस्या अनुराधा गोरखे, आशा सूर्यवंशी, मधुरा शिंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, नगरसचिव मुकेश कोळप, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, अनिल भालसाखळे, उपआयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, डॉ. प्रदीप ठेंगल, संदीप खोत, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान…
पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२६ नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीचे कामकाज उत्कृष्टपणे व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडणाऱ्या महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
रक्तदान शिबिराचेही उद्घाटन…
प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या वैद्यकीय विभाग व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्तकेंद्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

















