- सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २७ जानेवारी २०२६) :- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाऊंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रमुख पाहुणे रिझर्व्ह बँक मुंबई चे सहाय्यक व्यवस्थापक धनंजय भसे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. या ध्वजवंदन सोहळ्यात आशा भसे, भारतीय लष्कर व नौदलातील सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी डॉ. उदयसिंग परदेशी, ज्योतिषाचार्य व लेखक गुरुवर्य दत्तात्रय अत्रे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशनचे उपाध्यक्ष ॲड. महेश घोडके, शारदा फाउंडेशन मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष शंभु कोलते, प्रगतशील शेतकरी भागुजी काळोखे, शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
इ. चौथी ते सातवीतील निवडक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. यामध्ये मल्लखांब, लाठीकाठी, स्केटिंग, कराटे तसेच सेल्फ डिफेन्सच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी चित्तथरारक मानवी मनोरे रचून उपस्थितांची वाहवा मिळवली. शारिरीक शिक्षणाचे शिक्षक मायकल डेव्हिड व प्रतिक पांचाळ यांनीही यावेळी कराटे मधील प्रात्यक्षिके सादर केली.
वर्षभर शाळेमध्ये ‘भारतातील ऐतिहासिक स्मारके’ या संकल्पनेवर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या जवळपास ७० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजे तसेच आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले पाहिजे , असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धनंजय भसे यांनी व्यक्त केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी केले. सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा विकास कंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहशिक्षक हिमांशु झा व पूनम ढाकोळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर योगिता उचाडे यांनी आभारप्रदर्शन केले.

















