- भक्तिभावाने रोज हजारो भाविक घेतायत महाप्रसादाचा लाभ…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २७ जानेवारी २०२६) :- संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा, संत नामदेव महाराज व संत जनाबाई षष्ठशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा, संत सावता माळी ६३० वी जयंती व तपोनिघी नारायण महाराज त्रिशतकोत्तर प्रकाट्या वर्षानिमित्ताने वारकरीरत्न छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वात श्रीक्षेत्र भंडार डोंगर ट्रस्टने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला यावर्षी प्रथमच आयोजित केलेल्या ‘अखंड हरीनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी व गाथा पारायण व कीर्तन महोत्सव’ या सोहळ्यात सहभागी होत भाविकांनी अलोट गर्दी करून हा संपूर्ण भंडारा डोंगराचा परिसरच हरिनामाने मंत्रमुग्ध करून टाकला. शनिवार, रविवार हे आठवड्याचे सुट्टीचे दिवस व त्याला जोडून सोमवारी साजरा होत असलेलेल्या प्रजासत्ताक दिनाची सुट्टी, त्यामुळे पुणे जिल्हासह, संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगना, आन्द्रप्रदेश इ. देशभरातील हजारो भाविकांनी श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर जगद्गुरू तुकोबारायांचे दर्शन घेऊन या माघ शुद्ध दशमीच्या सोहळ्यात सहभागी झाले.

काकडा आरती, श्री विठ्ठल-रूक्मिणी, संत तुकाराम महाराजांना अभिषेक करून सकाळी एका मंडपात ज्ञानेश्वरी व दुसऱ्या मंडपात गाथा पारायण झाले. वारकरीरत्न हभप छोटे माऊली महाराज कदम यांच्या व्यासपीठ नेतृत्वात श्री ज्ञानेशारी पारायण व विदर्भातील वाकुळणी येथील संतपीठाचे प्रमुख हभप नानामहाराज तावरे यांच्या सुमधुर, रसाळ वाणीतून गाथा पारायण संपन्न होत आहे. रविवारी दुपारच्या सत्रात खेड, जुन्नर व आंबेगाव तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने हभप मिंडे महाराज यांची कीर्तनसेवा झाली. तसेच रात्री हभप जयवंत महाराज बोधले यांची कीर्तनसेवा झाली. बोधले महाराजांनी संत तुकोबारायांच्या धन्य काळ संतभेटी | पायीं मिठी पडिली तो || तुका म्हणे मंगळ आता | कोण दाता याहूनि || या अभंगातून निरुपण करीत संताचे महात्मे आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून भाविक श्रोत्यांना पटवून सांगितले.

शनिवारी दुपारच्या सत्रात पिंपरी-चिंचवड शहर वारकरी संप्रदायाच्यावतीने हभप बोराटे महाराज यांची कीर्तनसेवा झाली. तसेच रात्री हभप श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांची कीर्तनसेवा झाली. देगलूरकर महाराजांनी संत तुकोबारायांच्या ‘दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥ आतां मज ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥’ या अभंगावर निरुपण करीत साधना अत्यंत विश्वासाने, सातत्याने, पवित्र भावनेने केली तर जीवनात देव प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन करीत तुकोबारायांची चिंतन भूमी, अध्यात्मिक भूमी, साक्षात्कार भूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगराची महती विषद करीत तुकोबारायांच्या चरणी कीर्तन सेवा रुजू केली.
हजारो भाविक घेत आहेत महाप्रसादाचा लाभ
सलग तीन दिवसाची सुट्टी असल्याकारणाने भाविकांची या काळात अलोट अशी गर्दी होवून देखील प्रत्येक भाविकाला महाप्रसादाचा लाभ घेता यावा यासाठी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने स्वतंत्र भोजन मंडप उभारला असून हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. या महाप्रसादासाठी अनेक दानशूर दाते आर्थीक सहकार्य करीत असून संत तुकाराम महाराज सह. साखर कारखाना, तलाठी महासंघ, मावळ, खेड, मुळशी, हवेली तालुक्यातील शेतकरी मंडळीचे बहुमोल सहकार्य लाभत आहे.
आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर
दि. २३ ते दि. ३१ जानेवारी या संपूर्ण सप्ताहाच्या कालावधीमध्ये तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व एम.आय.टी. मेडिकल महाविद्यालयाच्या वतीने भाविक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून प्राथमिक औषध उपचार करण्यात येत आहेत. तसेच लाईफ लाईन ब्लड बँकच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १०० पेक्षा जास्त तरुण वारकरी भाविकांनी रक्तदान करून आपली सेवा तुकोबारायांच्या चरणी अर्पण केली.

















