सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ जानेवारी २०२६) :- चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन बँड पथकासमवेत प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सैनिकी वेशभूषा परिधान करून पथसंचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत उपस्थितांची मने जिंकली.

प्रमुख पाहुणे जगविख्यात ख्याती असलेले कला ग्रुप पुणेचे संस्थापक मनोजकुमार फुटाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांचा सत्कार संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत संस्थेच्या खजिनदार डॉ भूपाली शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, एमबीए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. वनिता कुऱ्हाडे, डॉ. पौर्णिमा कदम, डॉ. वृंदा जोशी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, उपमुख्याध्यापिका लीजा सोजू समवेत प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यासमवेत पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे मनोजकुमार फुटाणे व आदींच्या हस्ते शिक्षण, कला, क्रीडा आदी क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेले प्राध्यापक, शिक्षक, खेळाडू, गुणवंत विद्यार्थी आदींना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी देशभक्तीपर गीत, नृत्य सादरीकरण करण्यात आले.
मनोजकुमार फुटाणे म्हणाले, ‘कष्ट करण्याची तयारी, जिद्द व मनाशी दृढनिश्चय बाळगून, अभ्यासाबरोबर इतर कौशल्य आत्मसात करा. येणाऱ्या अडचणी, आव्हानावर मात करीत आपल्या आवडत्या क्षेत्रात भविष्यात यशस्वी व्हा. आत्मनिर्भर भारत हा चर्चेचा विषय नसून त्यासाठी स्वतःला झोकून देत, योग्य कृती करण्याची आवश्यकता असते. युवकांनी दृढनिश्चय केला तर आपला भारत देश सर्व क्षेत्रात प्रगती करेल. पदवी बरोबर इतर कौशल्य आत्मसात करा व मिळालेल्या संधीचे सोने करा. यासाठी युवकांनी देशासाठी योगदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे यावेळी त्यांनी आवाहन केले.
संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, ‘विद्यार्थिनी व युवकांनी आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून, ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहात ते मनापासून अभ्यास करून पूर्ण करा. नाविन्याची कास प्रत्येकाने अंगीकारावी. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी अचूक ज्ञान व त्यासाठीचे पुरक कौशल्यही आत्मसात करा. विकसित भारत प्रत्येकाचे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता समाजातील प्रत्येक घटकांनी सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
ध्वजारोहण समारंभाचे संयोजन क्रीडा विभागाचे डॉ. आनंद लुंकड, डॉ. शबाना शेख, प्रा. पांडुरंग इंगळे, डॉ. अभय पोद्दार समवेत संदीप शहा यांनी केले तर, विद्यार्थ्यांचे पथ संचलन व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वृंदा जोशी व शाळेच्या उपमुख्याध्यापिका लीजा सोजू समवेत शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्राजक्ता डिंगणकर यांनी केले.

















