सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इंद्रायणी नगर येथील शाळेतील विद्यार्थिनी लावण्या लोहारे हिने ऑनलाइन काळा घोडा कला स्पर्धेअंतर्गत घेण्यात आलेल्या कॉमिक्स चॅलेंज या प्रकारात उत्तेजनार्थ (Runner-up) पारितोषिक पटकावले आहे. राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ऑनलाइन काळा घोडा कला स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. देशभरातील २०० हून अधिक शाळांचा सहभाग आणि १००० पेक्षा अधिक कलाकृती (एंट्रीज) या स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा एक महत्त्वपूर्ण, स्पर्धात्मक आणि प्रेरणादायी कला मंच ठरली. ही स्पर्धा तीन आठवड्यांच्या कालावधीत राबविण्यात आली होती. प्रत्येक आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी कला आव्हाने देण्यात आली होती. यामध्ये डेली कॉमिक्स, बाहुल्या निर्मिती तसेच अभिव्यक्ती कला लँडस्केप्स या उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करण्याची संधी मिळाली.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशासनाधिकारी संगीता बांगर व कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले, मुख्याध्यापिका वंदना इन्नानी, कलाशिक्षक विकास आगवणे यांच्या अधिपत्याखाली विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या यशाबद्दल संबंधित विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळते. महापालिकेच्या शाळांमधील कला शिक्षण आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे.
विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका…

















