- ध्वजवंदन कार्यक्रमातील शाब्दिक वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २७ जानेवारी २०२६) :- मावळ तालुक्यातील धामणे गावात प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमादरम्यान मान-पानाच्या कारणावरून झालेल्या वादातून गंभीर हिंसक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात सात आरोपींसह काही अनोळखी व्यक्तींविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कुलदीप लोहोर (वय ४२, रा. धामणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ध्वजवंदन कार्यक्रमात महिला उपसरपंच आणि महिला ग्रामपंचायत सदस्या यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हिंसाचारात झाले.
आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. कु-हाड, लाठ्याकाठ्या तसेच हाताबुक्क्यांच्या सहाय्याने फिर्यादीचे वडील, आई, पत्नी व पुतण्या यांना मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वपोनि पाटील करत असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे धामणे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

















