- पहाटे घरात झोपेत असताना धारदार शस्त्राने हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ जानेवारी २०२६) :- पुण्यातील वाघोली परिसरात मंगळवारी पहाटे मन सुन्न करणारी घटना घडली. एका आईने आपल्या ११ वर्षांच्या मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. त्यानंतर तिने १३ वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला आणि घराबाहेर पळ काढल्याने तिचा जीव थोडक्यात वाचला. हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील बायफ रोड परिसरात राहणाऱ्या सोनी संतोष जायभाय या महिलेने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पहाटेच्या शांततेत घरातील सर्वजण झोपेत असताना तिने अचानक हे टोकाचे पाऊल उचलले. हल्ल्यात ११ वर्षांचा साईराज संतोष जायभाय याचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी धनश्री गंभीर जखमी झाली.
मुलीच्या किंकाळ्या ऐकून शेजारी तातडीने मदतीला धावले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. या कृत्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव की अन्य काही कारण, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे वाघोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

















