- भाजपच्या नगरसेविका शर्मिला बाबर यांना उपमहापौरपदाची लॉटरी…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ फेब्रुवारी २०२६) :- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक शितल ऊर्फ विजय गोरख शिंदे यांनी पक्षाकडून अधिकृतरीत्या जाहीर झालेले उपमहापौरपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राजकीय समीकरणे काही काळासाठी बदलली होती. परिणामी उपमहापौरपद भोसरी किंवा चिंचवड मतदारसंघातील नगरसेवकाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी सक्रिय आणि निर्णायक भूमिका घेत चाणक्यनितीचा अवलंब केला. त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना फोन करुन उपमहापौरपद पिंपरी मतदारसंघालाच मिळावे आणि ते दुसऱ्यांदा निवडून आलेल्या महिलेलाच देण्यात यावे, अशी ठाम भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पिंपरी मतदारसंघाला महत्त्वाचे पद न मिळाल्याची बाब पक्षपातळीवर पटल्याने प्रदेशाध्यक्षांनी आमदार अमित गोरखे यांच्या मागणीची दखल घेत, पिंपरी मतदारसंघातील नगरसेविका शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदासाठी उमेदवारी निश्चित केली, असेही समजते.
पिंपरीला उपमहापौरपद मिळवून देण्यात आमदार अमित गोरखे यांचा सिंहाचा वाटा असल्याने तेच पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे खरे ‘किंगमेकर’ ठरल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. सर्व महत्वाची पदे स्थानिक नगरसेवकांकडे आहेत. अशात नगरसेविका शर्मिला बाबर यांना पक्षाने उपमहापौरपदाची संधी दिल्याने सातारा-सांगली-कोल्हापुर जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.












