- दहा पोलिस निरीक्षकांच्या इतरत्र बदल्यांचे पोलिस आयुक्तांचे आदेश…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून, दहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी शनिवारी (दि. ३१ जानेवारी) याबाबतचे आदेश दिले असून, या बदल्यांमुळे विविध पोलिस ठाणे, वाहतूक शाखा तसेच गुन्हे शाखेतील कामकाजावर परिणाम होणार आहे.
दापोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव कोळी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिंचवड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश बांगर यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून, वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक दत्तात्रय चासकर यांची चिंचवड पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली आहे.
नियंत्रण कक्षातून पोलिस निरीक्षक संजय नरवाडे आणि महेंद्र कदम यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक वनीता धुमाळ यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक सुहास आहाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निगडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांची गुन्हे शाखेत बदली झाली असून, विशेष शाखेतील पोलिस निरीक्षक संदीप सावंत यांचीही गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
या अंतर्गत बदल्यांमुळे पोलिस दलातील कार्यक्षमता वाढेल तसेच गुन्हे नियंत्रण, तपास आणि प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.











