- तब्बल ६३ पीडित महिलांची सुटका; ४५ जण गजाआड…
सुरज करांडे, क्राईम प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षामार्फत शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाविरोधात मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई करण्यात आली आहे. विविध स्पा, लॉज, हॉटेल तसेच रहिवासी फ्लॅटमध्ये छापे टाकून एकूण ६३ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून ४५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निर्देशानुसार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान २ फेब्रुवारी रोजी वाकड पोलीस ठाणे हद्दीतील विशालनगर, जगताप चौक परिसरातील Eternal Family Spa येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत वेश्यागमनासाठी वापरल्या जाणाऱ्या चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी स्पा चालक महिला व स्पा मॅनेजर अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम (वय ३२) याला अटक करण्यात आली असून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच कालावधीत निगडी परिसरातील EAGLE SPA, कृष्णा लॉज तसेच आळंदी परिसरातील योगीराज लॉज येथेही छापे टाकण्यात आले. या कारवायांमध्ये आणखी पीडित महिलांची सुटका करून संबंधित स्पा व लॉज चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सन २०२५ मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षामार्फत एकूण २८ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ८ स्पा/मसाज पार्लर, ७ हॉटेल, ३ रहिवासी फ्लॅट आणि १० ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांत भारतीय न्याय संहिता व पिटा कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव करणाऱ्या महिलांविरोधात पिटा कायदा अंतर्गत १०७ महिलांवर ७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गंभीर बाब म्हणून, पोलीस आयुक्तांनी पिटा कायदा कलम अन्वये तीन आस्थापनांना एका वर्षासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, चिंचवड, काळेवाडी व सांगवी परिसरातील संबंधित स्पा यामध्ये समाविष्ट आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही कारवाई शहरात अनैतिक मानवी वाहतूक व बेकायदेशीर वेश्याव्यवसाय रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, पुढील काळातही अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.












