सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ फेब्रुवारी २०२६) :- चाकण परिसरात मित्रावर धारदार चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ही घटना ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथील भाड्याच्या खोलीत घडली. कपिल जितेंद्र कोसलकर याने अज्ञात कारणावरून त्याचा मित्र किशोर सुरेश राणे (वय २५) याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. हल्ल्यात राणे यांच्या छातीवर व जबड्यावर गंभीर वार करण्यात आले.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या किशोर राणे यांना तातडीने चाकण येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी योगेश दत्तात्रेय नाणेकर (वय ३०, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी कपिल कोसलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोते करीत आहेत.












