सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ फेब्रुवारी २०२६) :- जांबे (ता. मुळशी) येथील जमीन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे २०११ पासून सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी तुषार आत्माराम कलाटे (वय ४५, व्यवसाय बिल्डर, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी राजेंद्र कोंडीबा शितोळे (रा. जांबे, ता. मुळशी) आणि हिरामण ज्ञानोवा वाझे (रा. थेरगाव, पुणे) यांनी जांबे गावच्या हद्दीत जमीन खरेदी करून देण्याचे आश्वासन दिले होते, अशी तक्रार आहे.
फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी वेळोवेळी रोख रक्कम तसेच खात्यावरून पैसे घेतले. मात्र प्रत्यक्षात जमीन व्यवहार पूर्ण न करता संबंधित रक्कम परत केली नाही. एकूण १ कोटी १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी करीत आहेत.
जमीन व्यवहार करताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.












