- भाजपसह राष्ट्रवादीतील नगरसेवकांच्या नावांची उद्या घोषणा होणार?..
- प्रशासकीय राजवटीनंतर लोकनियुक्त सदस्यांची ‘स्थायी समिती’ अस्तित्वात येणार…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब विशेष सभा उद्या शुक्रवारी (दि. २०) आयोजित करण्यात आली आहे. या सभेत स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांवरील सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. महापौर व उपमहापौर निवडीनंतर ही महत्त्वाची सभा होत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
स्थायी समितीसाठी एकूण १६ सदस्यांची निवड होणार असून, विषय समित्यांसाठी प्रत्येकी १२ सदस्यांची निवड केली जाणार आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे ११, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) चे चार आणि शिवसेनेचा एक नगरसेवक असा संभाव्य वाटा असण्याची शक्यता आहे.
तसेच विधी समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, शिक्षण समिती आणि महिला व बालकल्याण समिती या पाच विषय समित्यांवर सदस्यांची निवड होणार आहे. नगरसेवकांच्या संख्येनुसार भाजपचे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक प्रत्येक समितीत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सभेत गटनेत्यांकडून आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची नावे बंद पाकिटातून सादर केली जातील. त्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल. सदस्यांची निवड पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी संबंधित समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडही केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.












