- चित्रपट प्रेमींना सर्व चित्रपट पूर्णपणे विनामूल्य पाहण्याची सुवर्णसंधी..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२७ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी आणि गाथा फिल्म सोसायटी यांच्या वतीने तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई, भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था, पुणे (एफटीआयआय) यांच्या सहकार्याने आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जागतिक दर्जाच्या चित्रपट महोत्सवास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात येत असलेला हा महोत्सव एक भव्य, वैविध्यपूर्ण आणि आशयघन सांस्कृतिक सोहळा ठरणार असून यंदाच्या महोत्सवात तब्बल ४३ देशांमधील ११६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. जागतिक स्तरावरील दर्जेदार कलाकृतींचा आस्वाद शहरातील चित्रपटप्रेमींना या महोत्सवाच्या माध्यमातून घेता येणार असून हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे.
महोत्सवात भारतासह अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, पोलंड, स्वीडन, सायप्रस, इटली, ट्युनिशिया, इजिप्त, मोरोक्को, लेबनॉन, पॅलेस्टाईन, चिली, ब्राझील, जपान, थायलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण कोरिया, अर्जेंटिना, मेक्सिको, तुर्की, इराण, दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस आदी देशांचा सहभाग आहे. विविध खंडांतील देशांमधून आलेल्या चित्रपटांमुळे महोत्सवाला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
या महोत्सवात लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन चित्रपट तसेच दीर्घपट अशा विविध प्रकारच्या चित्रपटांचा समावेश असून सर्व वयोगटातील प्रेक्षकांना लक्षात घेऊन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक चित्रपटातून समाजमनाला स्पर्श करणारे आणि विचारप्रवर्तक विषय प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत.
महोत्सवात सादर होणाऱ्या चित्रपटांमधून विज्ञान आणि अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, समाजव्यवस्था, निसर्ग व पर्यावरण, तंत्रज्ञान, प्रेम व मानवी भावना, महापूर व आपत्ती व्यवस्थापन तसेच महापुरुषांच्या जीवनावर आधारित असे विविध विषय मांडण्यात आले आहेत. याशिवाय शिक्षण व ज्ञानप्रबोधन, महिला सक्षमीकरण व लैंगिक समानता, युवा नेतृत्व विकास, ग्रामीण विकास व शाश्वत प्रगती, सामाजिक समता व मानवाधिकार, आरोग्य व मानसिक स्वास्थ्य जनजागृती, बालहक्क, कला व लोकसंस्कृती संवर्धन, उद्योजकता व नवकल्पना, जागतिक शांतता, दिव्यांग सक्षमीकरण, क्रीडा प्रेरणा, हवामान बदल जनजागृती आणि कुटुंब व्यवस्थेतील मूल्ये अशा सकारात्मक व समाजाभिमुख विषयांचाही देखील समावेश आहे.
चित्रपट क्षेत्रात महिलांना अधिक संधी आणि व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक’ हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महिला दिग्दर्शकांच्या सर्जनशीलतेचा गौरव करण्याचा हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरणार आहे. याशिवाय, ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ हा शहराच्या सांस्कृतिक समृद्धीत भर घालणारा आणि नव्या विचारांना चालना देणारा उपक्रम ठरणार आहे.
५ मार्च रोजी संपन्न होणार पारितोषिक वितरण समारंभ.
पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ अंतर्गत बुधवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी चित्रपट महोत्सवातील विविध स्पर्धा विभागांतील उत्कृष्ट चित्रपटांना सन्मानित करून पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. महोत्सवादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन चित्रपट तसेच दीर्घपट या विविध गटांमधील निवडक कलाकृतींना सन्मानित करण्यात येणार असून ‘सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक’ या विशेष पुरस्काराचाही यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभास चित्रपटसृष्टीतील मान्यवर, परीक्षक तसेच सहभागी दिग्दर्शक व निर्माते उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवात ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन.
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ मध्ये ग. दि. माडगूळकर सभागृह येथे ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आले आहे. मराठी माध्यमातील शिक्षणव्यवस्था, बदलते सामाजिक वास्तव आणि स्थानिक भाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. मराठी भाषा, शिक्षण आणि सांस्कृतिक ओळख यांचा परस्परसंबंध प्रभावीपणे उलगडणारा हा चित्रपट महोत्सवातील विशेष आकर्षण ठरणार असून चित्रपटप्रेमींना मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने चिंतन करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.
‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ हा आपल्या शहराच्या सांस्कृतिक समृद्धीला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. तब्बल ४३ देशांतील ११६ दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि मानवी मूल्यांवर आधारित आशयपूर्ण कलाकृती नागरिकांना पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून नव्या विचारांना दिशा मिळेल, तसेच विशेषतः महिला दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरेल. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या विनामूल्य महोत्सवाचा लाभ घ्यावा.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ हा केवळ चित्रपट प्रदर्शनाचा कार्यक्रम नसून विविध देशांतील आशयघन आणि दर्जेदार कलाकृतींच्या माध्यमातून सांस्कृतिक संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. यंदा ४३ देशांतील ११६ चित्रपटांची निवड करण्यात आली असून लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन आणि दीर्घपट अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. समाजप्रबोधन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, तंत्रज्ञान, मानवी मूल्ये आणि जागतिक शांतता अशा विषयांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषतः ‘सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक’ पुरस्काराच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा गौरव करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा.
– दत्ता गुंड, संस्थापक, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी.












