न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ७ मार्च २०२६) :- सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हरवलेले तब्बल १३० मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना परत देण्यात सांगवी पोलिसांना यश आले आहे. सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या मदतीने या मोबाईलचा शोध घेण्यात आला.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त बसरवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल नांदेकर आणि पोलीस अंमलदार राजकुमार माने यांनी ही कामगिरी बजावली.
शोध लागलेले मोबाईल सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या हस्ते मालकांना परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पोलिसांना पुढील कामासाठी प्रेरणा देणारा ठरत असल्याचे पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे यांनी सांगितले.












